लाल कांद्याला मिळाला विक्रमी भाव

 लाल कांद्याला मिळाला विक्रमी भाव

बीड, दि. ३(एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील  कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात भाव वाढ दिसली असून कांद्याच्या भावाने अर्धशतकी मजल मारली आहे. प्रतिक्विंटल कांद्याला पाच हजारापर्यंचा भाव मिळाला आहे. या हंगामातील ग्रामीण भागातील बाजार समितीत मिळालेला हा विक्रमी भाव आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून कडा  कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. येथे लाल कांद्याची आवक सुरू असून नाशिक कांदा या नावाने हा कांदा ओळखला जातो . या कांद्याचा टिकाऊपणा कमी असल्याने तो तयार झाला की लगेचच बाजारात विक्रीस आणावा लागतो.

दिवाळीनंतर या कांद्याची आवक सुरू असते . साधारण संक्रातीपर्यंत हा कांदा बाजारात विक्रीस येत असतो. हंगामातील कांद्याचे उत्पादन सुरू झाल्यावर  सुरुवातीला वीस ते तीस रुपये प्रति किलो दरम्यान असलेला भाव  झालेल्या लिलावात पन्नास रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला . मागील रविवारी झालेल्या लिलावात ३५ रुपये प्रति किलो एवढा सर्वाधिक भाव मिळाला होता. तोच बुधवारी आवक घटल्याने पन्नास रुपयापर्यंत पोहोचला. 

रविवारी सत्तावीस हजार कांदा गोण्याची आवक झाली होती. बुधवारी हेच प्रमाण निम्म्यावर आले होते. यापुढेही  साधारण महिनाभर ३० ते ४० रुपये या दरम्यान भाव राहू शकतील असा  व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

गावरान कांदा हा जास्त काळ टिकत असल्यामुळे परदेशात निर्यात करणे सोपे होते. त्याला भावही चांगला मिळतो मात्र नाशिक कांद्याची आवक सुरू असेल तो अनेक बाजारपेठेत विकला जातो. जानेवारीपासून गावरान कांद्याची आवक सुरू होईल साहजिकच त्यावेळी परदेशातही निर्यात सुरू होईल.

ML/KA/SL

3 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *