रायगड, पुणे घाट परिसरासाठी उद्या रेड अलर्ट जारी

मुंबई, दि. २७:- रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात उद्या( २८ सप्टेंबर ) रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
‘सचेत’च्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात येत असून भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्थांसोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.
राज्यात मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे :- लातूर जिल्हा ७५.३ मिमी., हिंगोली ६६.२ मिमी., परभणी ५४.९ मिमी., धाराशिव ५४.५ मिमी. आणि गडचिरोली जिल्ह्यात ५३.५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.