मंदोस चक्रीवादळ तामिळनाडूत धडकणार, महाराष्ट्रात या जिल्ह्यात अवकाळी पाऊस
मुंबई,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेले काही दिवस राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून ऐन हिवाळ्यात थंडी कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होत आता या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असं नाव दिलंय. आज हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडूतील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आपत्कालिन स्थिती निर्माण झाल्यास पूर्वतयारी म्हणून NDRF च्या तुकड्या सज्ज आहेत.
या वादळाचा परिणाम म्हणून राज्यात मुंबई आणि ठाणेसह इतर उपनगरामध्ये १२ डिसेंबर रोजी अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची (Rain Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१२, १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बदलत्या हवामानाच्या परिणाम व बंगालच्या उपसागरात होणाऱ्या वादळांमुळे आता दरवर्षीच हिवाळ्यात महाराष्ट्राला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र गेली काही वर्षे सातत्याने दिसून येत आहे.
SL/KA/SL
9 Dec. 2022