एसटी महामंडळात १७ हजार जागांसाठी भरती
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार असल्याने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ८ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक व सहायकपदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी शनिवारी केली. येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहायक उमेदवाराला सुमारे ३० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे.
येत्या पाच वर्षांत नव्या २५ हजार बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल होणार आहेत. महामंडळातील बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.