खड्डे बुजवण्यात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून ५० लाख ५३ हजार रूपयांचा दंड वसूल

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून वेगाने कामे सुरू ठेवली आहेत. मुंबई महानगरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खड्डेविरहीत आणि वाहतूक योग्य ठेवण्याकामी निष्काळजीपणा करणा-या विविध कंत्राटदारांवर महानगरपालिका प्रशासनाने बडगा उचलला आहे. खड्डे बुजविण्याकामी दिरंगाई करणा-या, प्रचलित नियमावलीनुसार रस्ते सुस्थितीत ठेवण्याकामी कुचराई करणा-या वेगवेगळ्या कंत्राटदाराना मिळून आतापर्यंत ५० लाख ५३ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पावसाने उघडीप देताच कंत्राटदारांनी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तातडीने खड्डे बुजवावेत, रात्रपाळीतदेखील कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.
सततच्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्याची (Bad Patches) डागडुजी करावी लागते. पावसाळ्या दरम्यान रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजविण्याची कार्यवाही लवकरात – लवकर करावी. विविध पर्यांयाद्वारे खड्डे, दुरूस्तयोग्य रस्त्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे २४ तासांच्या आत संबंधित अभियंत्याद्वारे व कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
मुंबईकर नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते आणि वाहतूक विभागामार्फत २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, पावसाळापूर्व तयारीच्या कामांमध्ये, सर्व दुरुस्ती योग्य रस्त्यांच्या कामांसाठी १८ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिक पद्धतीने तात्काळ बुजवत आहेत. तथापि, महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान पडलेले खड्डे आणि दुरूस्तीयोग्य रस्त्यांची डागडुजी कंत्राटदारांमार्फत विहित कालावधीत होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेऊन कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून आतापर्यंत ५० लाख ५३ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात खड्डे बुजविणाऱया कंत्राटदारांना मिळून २८ लाख ३० हजार रुपये, प्रकल्प कंत्राटदारांना मिळून २० लाख ४५ हजार रुपये आणि दोषदायित्व कालावधीतील कंत्राटदारांना मिळून १ लाख १८ हजार रुपये रकमेचा समावेश आहे. १ जून ते २५ जुलै या कालावधीतील हा दंड आहे.
या दंडाच्या रकमेचा विभागनिहाय विचार करता शहर विभागातील कंत्राटदारांना ८ लाख ८५ हजार रूपये, पूर्व उपनगरांमधील कंत्राटदारांना ५ लाख ४८ हजार रूपये, पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांना २४ लाख ८५ हजार रूपये आणि महामार्ग कंत्राटदारांना ११ लाख ३५ हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. त्यांच्या देयकातून ही रक्कम वसूल केली जाणार आहे.
SW/ML/SL
26 July 2024