गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी 3,515 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन

 गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी 3,515 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन

जळगाव दि. १८– जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दु:खामध्ये आहे. हल्ल्यात पर्यटक व नंतर झालेल्या कार्यवाहीत कांही जवान देखील शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, “जनसेवा याच शुभेच्छा” या भावनिक आवाहनाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिला.

गिरीष महाजन यांच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून एकूण 3,515 रक्ताच्या बाटल्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले, ज्याने केवळ एक सामाजिक उपक्रमच नव्हे, तर जनसेवेचा सण कसा असतो, याचे मूर्तिमंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले. यापूर्वी एका उद्देशासाठी एका दिवसात विविध ठिकाणी झालेल्या रक्त संकलनाचा देशातील उच्चांक हा जिल्हाधिकारी कार्यालय साजापूर मध्य प्रदेश येथे 2887 रक्तपिशव्यांचा होता. आता नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात रक्त संकलनाचा नवीन उच्चांक स्थापित करण्यात आल्याचा आयोजकांनी दावा केला आहे.

“वाढदिवस नव्हे, जीवनदानाचं कारण ठरलं”

गिरीष महाजन यांनी आपल्या आवाहनात म्हटले होते की, “या दुःखाच्या काळात आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी आपण काही उपयोगी कार्य केले पाहिजे. वाढदिवस केवळ केक कापण्यापुरता मर्यादित न राहता, तो कुणाच्यातरी जीवनात प्रकाश आणणारा असावा.” या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांच्या समर्थकांनी, सामाजिक संस्थांनी आणि अनेक स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिरांची जबाबदारी उचलली.

तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

या उपक्रमात युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. समाजातील विविध स्तरातुन, व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेत शिबिरे यशस्वी केली. अनेक ठिकाणी रक्तदात्यांची रांग लागलेली दिसून आली. “हे केवळ रक्तदान नाही, तर ही देशासाठीची आपली छोटीशी जबाबदारी आहे,” अशा भावना व्यक्त करत अनेक तरुणांनी या उपक्रमात भाग घेतला.

आरोग्य संस्थांचेही सहकार्य

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याचे स्मरण करत, आणि त्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हे शिबिर राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नाशिक ब्लड बँक, सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक, जनकल्याण रक्तपेढी, नवजीवन ब्लड बॅक, बिटको ब्लड बॅक, अर्पण ब्लड बॅक, मेडीकल कॉलेज ब्लड बॅक व समता ब्लड बॅक यांचे सहीत सरकारी व विविध खासगी रक्तपेढ्यांचेही मोठे योगदान लाभले. त्यांच्याकडून तांत्रिक आणि वैद्यकीय सहाय्य मिळाले. रक्तसंकलन, साठवण आणि वाहतूक या सर्व प्रक्रियांमध्ये शिस्तबद्धता ठेवण्यात आली. या प्रत्येक ठिकाणी भाजप पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, जी.एम.आरोग्य सेवा, संयोजक व रक्त संकलन पदाधिकारी यांनी नियोजनाची जबाबदारी घेतली .

सामाजिक कार्यासाठी नवा दिशादर्शक

गिरीष महाजन यांच्या या कृतीने समाजात एक सकारात्मक उर्जा संचारली आहे. संकटाच्या काळातही आपण काही चांगले करू शकतो, ही भावना बळकट झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपताना वाढदिवस साजरा करण्याची ही नवी संकल्पना आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. “वाढदिवसाची खरी मजा ही इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात आहे,” असं सांगत गिरीष महाजन यांनी जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमाने मानवतेचा एक नवा मानक निर्माण केला असून, राज्यात त्याचे सकारात्मक पडसाद उमटतील यात शंका नाही.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *