स्पीडब्रेकरमुळे पुर्नजन्म! मृतदेह घरी नेताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा झाले जिवंत
एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. 16 डिसेंबरला पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाऊ लागले. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका कसबा बावडा परिसरात अचानक खड्ड्यात आदळली आणि याचा झटका लागून त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल झाली. हे पाहून नातेवाईकांनी पांडुरंग यांना पुन्हा रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार झाले. आणि २ जानेवारीला १५ दिवसांनी पांडुरंग उलपे रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ते आपल्या पायावर उभा राहून घरी चालत आले.