कसब्यात कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय

पुणे,दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या तसेच भाजपा आणि मविआ यांनी आपली सर्व ताकद पणाला लावलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या चुरशीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करणारे कॉग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. यामुळे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसब्यावर तब्बल २८ वर्षांनी भाजप उमेदवार पराभूत झाला आहे. अतिशय अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे.
या विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जनतेचे आभार मानले आहेत. धंगेकर लिहितात, “मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार! हा विजय तुमचा आहे, हा विजय आपला आहे!” या निवडणुकीत विजयी झाल्यावर रवींद्र धंगेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान आपला पराभव मान्य करत भाजपचे उमेदवार हेमंत रासने म्हणाले, “कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रणा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती”.
भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या मृत्यू मुळे रिकाम्या झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील जागेवर टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली जात होती. मात्र भाजपने टिळकांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. त्यामुळे भाजपचा पराभव झाला अशा प्रतिक्रिया विविध माध्यमांतून व्यक्त होत आहेत.
SL/KA/SL
2 March 2023