नगरपालिका निवडणुका पूर्वीच्याच कार्यक्रमाप्रमाणे घ्या, रविंद्र चव्हाण यांची मागणी
मुंबई दि १ : राज्यातील काही नगराध्यक्षपदाच्या व नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निवडणुक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय बदलावा व पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे या निवडणुका घ्याव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चव्हाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून त्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार होते मात्र यापैकी काही निवडणुका तांत्रिक मुद्याच्या आधारे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील 24 नगराध्यक्ष व 204 नगरसेवकांची निवडणूक लांबणीवर पडली आहे. हा निर्णय सर्व उमेदवारांवर अन्याय करणारा आहे.
नगरपालिका निवडणूक नियम 1966, राज्य निवडणुक आयोगाचे 4 नोव्हेंबरचे सहपत्र आणि 29 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश यात समन्वयाचा अभाव असल्याने ज्या ठिकाणी अपिलाचा निर्णय 26 नोव्हेंबर नंतर लागला असेल किंवा उमेदवार स्वत: शपथ पत्र देत असल्यास या निवडणुका स्थगित न करता त्या पूर्वीच्याच कार्यक्रमाप्रमाणे घेण्यात याव्यात अशी मागणी चव्हाण यांनी राज्य निवडणुक आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.ML/ML/MS