करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा

 करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा

कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सवाचा बुधवारी रात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थानकालीन काही नोंदीनुसार 1824 पासून रथोत्सवाचा उल्लेख सापडतो. देवी अंबाबाई हे महाराष्ट्राचं रक्षक दैवत मानलं जाते. रथोत्सव हा अंबाबाईच्या शक्ती आणि भक्तीचा उत्सव मानला जातो. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा भरते, तर दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात आई अंबाबाईचा रथोत्सव सोहळा साजरा केला जातो. हा उत्सव केवळ धार्मिक कारणानं महत्त्वाचा नाही, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेत त्याचं मोठं स्थान आहे.

सुमारे 200 वर्षांची परंपरा असलेल्या अंबाबाईच्या रथोत्सव सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली अंबाबाई देवी जागृत असून, तिला आद्य शक्तिपीठ मानलं जाते. कोल्हापुरात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. कोकणचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आला, त्यावेळी अंबाबाईची मूर्ती एका लहानशा मंदिरात होती. त्यानं मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छता करून मंदिर प्रकाशात आणलं. वास्तुरचनेचा विचार केल्यास चालुक्य राजवटीत मंदिराचं बांधकाम केलं गेलं असावं, असा अभ्यासकांचा दावा आहे.

हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिराला 5 कळस आहेत. जुन्या मंदिरातील खांबांना गरुड खांब म्हणतात, ठरावीक दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या पायाशी पडतात. हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूरला येतात. याशिवाय रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळ अष्टमीला विशेष आरती केली जाते.

अंबाबाईचा रथ सागवानी लाकडापासून बनवला असून, त्यावर चांदीचा पत्रा बसवण्यात आला आहे. सुंदर नक्षीकाम असलेला हा रथ गेल्याच वर्षी नव्यानं बनवला आहे. फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवलेल्या रथावर देवी अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान होऊन पारंपरिक वाद्यांच्या घोषात लवाजम्यासह नगर प्रदक्षिणेला निघते. भक्तांकडून रथावर पुष्पवृष्टी केली जाते. मार्गावर फुलांचा गालीचा, अंबामातेचा अखंड जयघोष, नेत्रदीपक आतषबाजी, बँड, लेझीमपथकं, चौऱ्या आणि मोर्चे धरणारे अशा पवित्र मंगलमय वातावरणात ही रथयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघते.

ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव पार पडतो. साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनं देवीचा रथ मंदिरातून बाहेर पडतो. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत अंबाबाई देवीचा रथ महाद्वाररोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गावरुन पुढं जात पुन्हा मंदिरात परत येतो. यावेळी या मार्गावर आकर्षक फुलांच्या रांगोळी काढलेली असते. तर काही ठिकाणी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र यंदा अचानक आलेल्या पावसानं काही ठिकाणी रांगोळी वाहून गेली. मात्र भक्तांकडून पुन्हा काही वेळातच नव्यानं रांगोळी काढण्यात आली.

ML/ML/SL

25 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *