रानटी हत्तींचा उपद्रव वाढला, शेतकरी चिंताग्रस्त

सिंधुदुर्ग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसात रानटी हत्तींचा उपद्रव वाढत चालला आहे. तिलारी खोरे परिसरातील मोरले , केर आदी गावांमध्ये सध्या पाच रानटी हत्ती फिरताना दिसत आहेत. यामध्ये दोन नर, एक मादी आणि दोन पिल्ले यांचा समावेश आहे. हे हत्ती वाडी वस्तीतून फिरताना शेती आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत . काही दिवसांपूर्वीच मोरले येथील शेतकऱ्यावर हल्ला करून हत्तीने ठार मारले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण देखील आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या भागात दौरा करून येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. उपद्रवी हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांपासून येथील शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यात येईल तसेच उपद्रवी वन्य प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल , असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
हत्तींचा वाढता उपद्रव पाहता येथील रानटी हत्तींचा उपद्रव कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.
ML/ML/PGB 17 April 2025