राणीबागेत १२ मार्च रोजी होणार ‘बांबू लागवड विविध योजना आणि कार्यशाळा
मुंबई, दि ११
मुंबईतील उद्यानांमध्ये बांबू लागवड करण्याबाबतची सखोल माहिती देण्यासाठी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्री. पाशा पटेल यांच्यासह बांबू लागवड क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात गुरुवारी (दिनांक १२ मार्च २०२६) ‘बांबू लागवड, विविध योजना व महत्त्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पेंग्विंन सभागृहात दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी, उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच उद्यान विषयक क्षेत्रातील अभ्यासकांसह, पर्यावरणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
बांबू लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना व धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसह बांबू लागवडीचे शास्त्रीय, सामाजिक महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. या कार्यशाळेदरम्यान मुंबईकरिता अनुकूल बांबूच्या विविध प्रजाती व त्यांची लागवड याबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेनंतर मुंबईमध्ये करावयाच्या बांबू लागवडीकरिता स्थळनिहाय प्रजाती निश्चित करण्यास मदत होणार आहे.
बांबू ही पर्यावरणपूरक, जलद वाढणारी व बहुपयोगी वनस्पती आहे. पर्यावरण संवर्धन तसेच हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. बांबू लागवड केल्यास मृदासंवर्धन, हरित आच्छादनात वाढ होवू शकते. यामुळे सदर एक दिवसीय कार्यशाळेत बांबू लागवडीचे फायदे आणि पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वाढणारे शास्त्रीय महत्त्व या विषयांवरही चर्चा होणार असल्याचे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.KK/ML/MS