भायखळ्याची राणी बाग आता गजराजाविना पोरकी

 भायखळ्याची राणी बाग आता गजराजाविना पोरकी

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आनंदाने झुलणाऱ्या गजराजांच्या वास्तव्यामुळे एकेकाळी प्रसिद्ध असलेली भायखळा येथील जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेत यापुढे हत्तीचे दर्शन घडणार नाही. कारण राणीच्या बागेत येणार्‍या आबालवृद्धांचे मनोरंजन करणाऱ्या विशाल देहयष्टी असलेल्या शेवटच्या हत्तीणीचा अलिकडेच मृत्यू झाला.’अनारकली’ असे या ५९ वर्षीय हत्तीणीचे नाव होते.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने २०१६ मध्ये घेतला निर्णयामुळे देशातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात हत्ती ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे राणीच्या बागेतील हत्तींचा अधिवास आता पोरका झाला आहे,या उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.दरम्यान, राणीच्या बागेत सिंहाची गर्जना ऐकण्यासही पर्यटकांना आणखी काही काळ धीर धरावा लागणार आहे.कारण राणीबागेत सिंहाचे आगमनही निश्चित झालेले नाही.

संजय त्रिपाठी म्हणाले की, अनारकली ही राणीच्या बागेतील सर्वात वयोवृद्ध प्राणी होती.तसेच जिजामाता उद्यानात अनारकली हत्तीण गेल्या महिन्यात एक दिवस संध्याकाळी अचानक जमिनीवर बसली, त्यानंतर तिला उठताच आले नाही. १९७७ मध्ये अनारकली व लक्ष्मी या दोन्ही हत्तीणी येथे आल्या होत्या.काही वर्षांपूर्वी त्यांच्या जोडीला एक नर हत्ती आणला होता. मात्र नंतर त्याला केरळला परत पाठवण्यात आले होते. या दोघींपैकी लक्ष्मीचा चार वर्षांपूर्वी संधिवाताने मृत्यू झाला.तेव्हापासून अनारकली एकटीच राहत होती.अनारकलीला दफन करण्यापूर्वी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यामध्ये तिच्या शरीरात तब्बल दीडशे किलोचा ट्युमर असल्याचे आढळून आले होते. मात्र ती जिवंत असताना त्याची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. मोठ्या प्राण्यांमध्ये याप्रकारची चाचणी करणे अवघड असते,असेही जिजामाता उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

SL/ML/SL

25 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *