प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रांगोळी कारखाना.
वर्धा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथील शास्त्री चौक येथे राहणाऱ्या वृषाली अमोल हिवसे यांनी लहानपणापासून चित्रकलेची आवड जपली.Rangoli factory through Pradhan Mantri Rojgarkaran program.
वृषाली ताईंना रंगांबद्दल फार आकर्षण होते. शिवाय त्या रांगोळी ही फार उत्तम काढतात. अगदी चार-पाच फुटापासून ते 72 फुटापर्यंत त्यांनी रांगोळी काढलेली आहे.
या रांगोळी काढण्याच्या आवडीतूनच त्यांनी रांगोळी खरेदी विक्री व्यवसायाला सुरुवात केली.परंतु त्यातून फारसा नफा मिळत नव्हता आणि वेळही खूप जायचा. त्यामुळे त्यांनी रांगोळीचा कारखाना टाकण्याचा निर्णय घेतला.
असा केला प्रयत्न
पती अमोल हिवसे यांची खंबीर साथ सोबत होतीच. जिल्हा उद्योग केंद्र वर्धा येथून त्यांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25 लाख रुपयांचेकर्ज मिळाले. हे मिळालेले कर्ज आणि जवळची काही मिळकत यामुळे त्यांनी एमआयडीसी परिसरात साडेसहा हजार स्क्वेअर फिट मध्ये ‘नंदन कलर्स’ या नावाने विविध रंगाच्या रांगोळी तयार करण्याचा कारखाना उभारला.
या कारखान्यामध्ये त्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या रांगोळी तयार करतात. एक म्हणजे साध्या पांढऱ्या रांगोळी पासून रंगीत रांगोळी तयार करणे. आणि दुसरे म्हणजे रेती पासून रंगीत रांगोळी तयार करणे.
रंगांची आवड आधीपासूनच असल्याने विविध रंगांचे आकर्षक शेड्स कसे तयार करायचे यावर त्यांचा विशेष भर असतो. पांढरी रांगोळी व रेतीपासून मशीनच्या सहाय्याने रंग मिसळून त्या लाल, हिरवा, पिवळा, पोपटी, नारंगी, हिरवा, जांभळा, काळा, गुलाबी अशा विविध रंगांच्या रांगोळी त्या तयार करीत आहेत.
रांगोळीची प्रक्रिया काय
मशीन मधून रांगोळी निघाल्यानंतर तिला काही वेळ सुकू दिले जाते. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये 10 किलो याप्रमाणे मोजून मशीनच्या साह्याने त्याची पॅकिंग केली जाते. विशेष म्हणजे पॅकिंग साठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या ही त्या शेतकरी बांधवांनी धान्यासाठी वापरलेल्या पिशव्या
विकत घेतात.
त्या उलट्या करून त्यात रांगोळी भरली जाते. भरलेली रांगोळी या गोदामामध्ये रंगानुसार ठेवली जाते. यातून त्या दहा लोकांना रोजगार देत आहेत. दिवाळीच्या काळात त्यांच्याकडे कामाचा व्याप भरपूर वाढतो. त्यामुळे जास्तीच्या मजुरांना कामावर ठेवले जातात.
दहा किलोच्या बॅग सोबतच छोट्या डब्यांमध्ये सुद्धा रांगोळी स्वतःच्या दुकानात विक्रीसाठी ठेवले जाते.
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ते आपल्या रांगोळीची विक्री आज करीत आहे.अनेक ठोक व चिल्लर विक्रेते त्यांच्याशी जुळलेले आहेत.
यावर्षी तर होळी साठी लागणारे विविध आकर्षक रंगांचे गुलालही त्यांनी तयार केलेले आहेत. भविष्यात पोस्टर रांगोळी सोबतच रांगोळीचे सर्वच प्रकार तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.
ML/KA/PGB
6 Mar. 2023