यावेळी रीलिज होणार रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’चित्रपट

 यावेळी रीलिज होणार रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’चित्रपट

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हजारो वर्षे भारतीयांच्या ह्रदयावर राज्य करणारी रामकथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे दिव्य अद्याप भारतीय चित्रपट सृष्टीत फारसे झालेले नाही. त्यातच आदिपुरुषच्या असमाधानकारक सादरीकरणानंतर रामायण विषयावर मोठ्या पडद्यावर चित्रपट साकारणे हे मोठे दिव्य ठरणार आहे. हे शिवधनुष्य आता दिग्दर्शक नितीश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांनी उचलले आहे. सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी ‘रामायण’चे पोस्टर शेअर केले असून, सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची माहिती दिली.

या पोस्टमधून मेकर्सनी असे सरप्राइजही दिले की, ‘रामायण’ हा सिनेमा दोन भागात प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही भागांच्या रिलीजच्या तारखांची घोषणा करताना त्यांनी माहिती दिली की, सिनेमाचा पहिला भाग पुढील वर्षीच्या दिवाळीत म्हणजेच, दिवाळी २०२५च्या दरम्यान प्रदर्शित होईल. तर ‘रामायण पार्ट २’ची रीलिज डेट ‘दिवाळी २०२६’ ठरवण्यात आली आहे. म्हणजेच नितीश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेले संपूर्ण रामायण पाहण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

नमित यांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘एक दशकाहून अधिक काळापूर्वी, मी ५००० वर्षांपासून अब्जावधींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला.’ त्यांनी असेही म्हटले की या सिनेमाशी संबंधित त्यांच्या टीम अविरतपणे काम करत आहेत आणि याविषयी घोषणा करताना त्यांना अतिव आनंद होतो आहे. ‘रामायण’मधून आपला इतिहास, आपले सत्य आणि आपली संस्कृती यांचे सर्वात अस्सल, पवित्र आणि दृश्यास्पद रूपांतर सादरीकरण जगभरातील लोकांसाठी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

रामायण’ या आगामी सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत्या. शिवाय अभिनेत्री साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारणार असून, लारा दत्ता कैकेयी आणि अरुण गोविल दशरथ राजाच्या भूमिकेत दिसेल, असेही समोर आलेले. या कलाकारांचे सेटवरुन लीक झालेले फोटोही समोर आलेले. यामध्ये ‘KGF’चा स्टार अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे.

SL/ML/SL

6 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *