रामोशी समाजाची होणार राज्यव्यापी परिषद
मुंबई, दि २५
बेरड आणि रामोशी समाजाच्या एकजुटीचे आणि प्रगतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाणारी राज्यव्यापी नोकरदार परिषद येत्या २९ मार्च रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय, अग्निशमन दलाशेजारी, जुने शारदा टॉकीज जवळ, दादर (पूर्व), मुंबई, येथे होणार आहे.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिशा ठरविण्याचा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. इतिहास पाहता शौर्य, धाडस, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यासाठी ओळखला जाणारा हा समाज हिंदवी स्वराज्यातील गुप्तहेर प्रमुख राजे बहिर्जी नाईक, आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक आणि शिवभक्त बेडर कन्नप्पा यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा वारसा जपणारा आहे. देशरक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी या समाजातील वीरांनी मोठ्या प्रमाणात बलिदान दिले, मात्र आजही समाज मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीचे दर्शन घडवावे, तसेच आपले विचार मांडून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याचा प्रयत्न यात केला जाणार असून या पार्श्वभूमीवर समाजाला २१व्या शतकात प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
याआधी लोणंद (सातारा), तासगाव (सांगली), उमरगा (धाराशीव) आणि श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे जिल्हास्तरीय बैठका घेऊन समाज बांधवांमध्ये संवाद आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यात आली आहे.
या उपक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ समाज विकास हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.KK/ML/MS