रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सदानंद कदम यांना मुंबईला आणण्यात येणार असून त्यांची मुंबईतच कसून चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे.
आज पहाटे ईडीने सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ईडीने याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, सदानंद कदम यांना आता मुंबईत आणले जाणार असून त्यांची कसून चौकशी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून साई रिसॉर्टप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे.
दरम्यान साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासोबत सातत्याने सदानंद कदम यांचे नाव जोडले जात होते. याप्रकरणात आता त्यांना ताब्यात घेतल्याने ईडीच्या कारवाईला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
SL/KA/SL
10 March 2023