अनुसूचित जमातींच्या विविध मागण्यासाठी संविधान दिनानिमित्त महारॅली

 अनुसूचित जमातींच्या विविध मागण्यासाठी संविधान दिनानिमित्त महारॅली

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : जनजाति सुरक्षा मंचाद्वारे ‘डीलिस्टिंग’ (धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळणे ) या मागणीसाठी रविवार २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने भव्य डी लिस्टिंग रॅलीचे आयोजन दादर ते वरळी करण्यात आले असल्याची माहिती जनजाति सुरक्षा मंचाचे कोकण प्रांत संयोजक विवेक करमोडा यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई ते सिंधुदुर्ग या कोकण क्षेत्रातील जनजाती बहुल जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो जनजाती (आदिवासी) बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. ‘डीलिस्टिंग’ या एकाच मागणीचा हुंकार या महारॅली मध्ये असणार आहे.

मुंबई शहरातील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथून सकाळी ११ वाजता आपल्या लोककला व संस्कृती परंपरेसह जनजाती समाजाची शोभायात्रा वरळीच्या जांबोरी मैदान येथून निघून हुतात्मा नाग्या कातकरी मैदानात महासभेत रुपांतरीत होईल. धर्मांतरित झालेल्या नागरिकांना अनुसूचित जनजाती श्रेणीतून तात्काळ दूर करावे आणि त्यासंदर्भात आवश्यक संविधानिक संशोधन केले जावे ही जनजाती सुरक्षा मंचाची प्रमुख मागणी आहे असे किरण गबाळे यांनी सांगितले.

मुंबई सह संपूर्ण भारतात धर्मांतरणाची पाळेमुळे अगदी खोल रुजली असून, भारतातील अनुसूचित जनजाती समाजाकरिता हा फार मोठा धोका आहे. ख्रिश्चन तसेच मुस्लिम धर्मांतरणाच्या माध्यमातून भोळ्या भाबड्या आदिवासींचे धर्मांतर करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु यात सातत्याने वाढ होते आहे. अशाप्रकारच्या धर्मांतरणाने आदिवासी समाजाला हळूहळू षडयंत्र रचून त्यांच्या मूळ संस्कृती व परंपरांपासून दूर केले जात आहे,असे शरद चव्हाण यांनी सांगितले.

जनजातींची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व प्रथा,परंपरा न पाळणाऱ्या आणि आदिवासी देव देवतांची पूजापद्धती, देवकार्य, सण-उत्सव यांचा त्याग करून परधर्मात गेलेल्या आदिवासी व्यक्तीला वा समूहाला अनुसूचित जमातीच्या यादीतून हटवण्यात यावे तसेच मूळ जनजातींसाठी (आदिवासींसाठी) असणाऱ्या सोयी सुविधा व आरक्षणाचा दुहेरी लाभ सदर धर्मांतरीत आदिवासींना मिळू नये आदी मागण्या यावेळी युवराज लांडे यांनी सरकारकडे मांडल्या आहेत.

ML/KA/SL

22 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *