राज्यसभा निवडणूक बिनविरोध
मुंबई दि ५ : राज्यसभेच्या २०२६ मधील द्विवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातील सात जागांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, रामराव वडकुते, माया ताई ईवनाते आणि रामदास आठवले यांनी आज विधानभवनात निवडणुक अधिका-यांकडे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माधुरी मिसाळ, मंत्री अशोक उईके, आदि मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना पक्षाच्या वतीने ज्योती वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पार्थ पवारांनी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला. या प्रसंगी आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उद्या अर्जांची छाननी होणार असून नऊ तारखेला माघारीचा शेवटचा दिवस आहे, मात्र सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल.ML/ML/MS