राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणार

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढील लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी 20 मार्चला सभागृहात माहिती देत घोषणा केली. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतरही त्यांनी राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा बैठक सुरू असल्याचे म्हटले होते.
राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नावर लेखी उत्तर देताना दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले आहे. यानुसार राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिल पासून नवीन सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विषयीच्या चर्चेला उत्तर मिळाले आहे.
पालक आणि शिक्षक चिंतेत
शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याची सूचना जारी केली. मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात, अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे. त्यातच आता मुंबईतील शाळांमधील मुख्याध्यापकांसमोर या निर्णयामुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या नव्या सुचनेप्रमाणे परीक्षा संपवून नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलाय.अनेक शाळांमध्ये इयत्ता दहावीचे वर्ग एप्रिल महिन्यातच घेण्यास सुरु होतात. सामान्यप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दहावीच्या मुलांचे वर्ग सुरु होतात. याच काळात दहावीच्या मुलांचा बराचसा अभ्यासक्रमही पूर्ण करतात. मात्र आता नव्या सुचनेनुसार वार्षिक परीक्षाच 22 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्यामुळे दहावीच्या या वर्गांचे नियोजन आता करता येणार नाही, अशी खंत शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
ML/ML/PGB 20 Jan 2025