उमेदवाराने क्रिकेट खेळून केला प्रचार!
मुंबई, दि.३ (प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली. भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११४ च्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार राजुल संजय पाटील यांनी निवडणुकीच्या धामधुमीत क्रिकेट खेळून प्रचाराला सुरवात केली. त्यांना भांडुप मधून लोकांचा पाठिंबा मिळत असून त्यांच्या प्रचार फेरीला स्थानिक नागरीकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे.
शिवसेना पक्षाचे (उबाठा) स्थानिक खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल संजय पाटील या भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणुक लढवित आहेत. गेले अनेक वर्षे त्या सामाजिक कार्य करीत असून भांडुप मध्ये त्यांनी अनेक भागात शौचालय, नाले, गटारे यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. स्थानिक नागरीकांच्या मागणी नुसार त्यांनी शेड, संरक्षक भिंत बांधून दिली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक ११४ मधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या कामांमुळे राजुल पाटील भांडुपकरांच्या परिचयाचा चेहरा झाला असून त्यांच्या प्रचार फेरीला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. प्रचारा निमित्त त्या शाखा क्रमांक ११४ ला गेल्या असताना त्यांनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळून त्याचा आनंद घेतला. यावेळी खासदार संजय दिना पाटील व विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांनी गोलंदाजी केली.ML/ML/MS