पाऊस थांबला तरी पूरस्थिती कायम…

सांगली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी पूरस्थिती बदललेली नाही. कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी कमी होण्याची लोक वाट पाहत आहेत. सतत पडणारा पाऊस लक्षात घेऊन सैन्य दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी तूर्त काही दिवस सांगली येथे थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोयना तसेच वारणा धरणातील विसर्ग अद्याप सुरू आहे. नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी व्हायला तयार नाही. अन्यत्र पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पात्रात पाणी टिकून आहे. कोल्हापूरहून येणारे पंचगंगा नदीचे पाणी कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात मिसळत आहे. त्यामुळे सांगली, हरिपूर आणि म्हैसाळ येथून येणारे पाणी संथगतीने पुढे जात आहे. तर पुराचे पाणी पात्राबाहेर काही ठिकाणी साठलेले आहे. असंख्य लोक मदत छावण्यात आसरा घेत आहेत. कृष्णा नदीतील पुराचे पाणी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश ही तीन राज्य ओलांडून अरबी समुद्राच्या दिशेने वाहत आहे.
कोयना धरण 77 टक्के भरले असून वारणा धरण 97 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणातील विसर्ग आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पूरस्थिती उद्भवली होती आता पावसाचा जोर कमी झाला असून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे 48 राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पर्यायी मार्गावर ही वाहतूक वळविण्यात आली आहे गरज पडल्यास सैन्य आणि एन डी आर एफ यांची पुन्हा मदत घेतली जाईल, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माध्यमांना दिली.
जलसंधारण विभागाने एक बैठक घेऊन पूरग्रस्त भागातील पाण्याचे नियोजन केले. ताकारी, म्हैसाळ तथा टेंभू योजना बरोबर पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात सोडावे अशी मागणी पुढे आली आहे. दुष्काळी भागातील बंधारे या पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी होत आहे. सांगली महापालिकेने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. 200 कर्मचारी त्यासाठी काम करीत असून आतापर्यंत 20 टन कचरा गोळा करण्यात आला आहे .
ML/ML/PGB
31 July 2024