प्रवासात अधिक सामान नेल्यास रेल्वे आकारणार 6 पट दंड

मुंबई, दि.१९ : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या बॅगेच्या किंवा कार्टनच्या आकारासोबतच त्याच्या वजनाकडेही लक्ष द्यावे लागेल. जर बॅग हलकी असेल पण आकाराने मोठी असेल आणि जास्त जागा व्यापत असेल तर तुम्हाला प्रवास तिकिटासह सामान बुक करावे लागेल. जर तुम्ही ते प्री-बुकिंग केले नसेल, तर तुम्हाला निश्चित सामान शुल्काच्या 6 पट जास्त शुल्क भरावे लागू शकते आणि दंड देखील आकारला जाऊ शकतो. भारतीय रेल्वेने देशातील सर्व झोनमध्ये प्रवेश आणि निर्गमन गेटवर इलेक्ट्रॉनिक वजन यंत्रे बसवण्यास सुरुवात केली आहे. सध्या कानपूर सेंट्रल, मिर्झापूर, अलीगड, प्रयागराज जंक्शन आणि टुंडला यासारख्या काही प्रमुख स्थानकांवर हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. रेल्वे हळूहळू देशभरातील प्रमुख स्थानकांवर तो लागू करण्याची तयारी करत आहे.
सामान नेण्याची मर्यादा

१०० सेमी x ६० सेमी x २५ सेमी (लांबी x रुंदी x उंची) आकाराचे ट्रंक, सुटकेस आणि बॉक्स प्रवासी डब्यात वाहून नेले जाऊ शकतात. जर ट्रंक, सुटकेस किंवा बॉक्स यापैकी कोणत्याही एका आकारापेक्षा मोठे असेल, तर असे सामान प्रवासी डब्यात न ठेवता ब्रेक व्हॅनमध्ये बुक करून वाहून नेले पाहिजे. एसी ३ टियर आणि एसी चेअर कार कोचमध्ये वाहून नेल्या जाणाऱ्या ट्रंक/सुटकेसचा कमाल आकार ५५ सेमी x ४५ सेमी x २२.५ सेमी आहे.