रायगडमधील १०३ गावांना दरडींचा धोका
अलिबाग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे सतर्क होत शासनाने आता दरडीचा धोका संभवणाऱ्या १०३ गावांची यादी जाहीर केली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संभाव्य दरडग्रस्त गावांना पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरडग्रस्त गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी दिले आहेत.
२०२१ मध्ये तळीये गावावर दरड कोसळली होती. या भीषण दुर्घटनेत ८४ जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या वर्षी इरशाळवाडी येथे दरड कोसळून अनेकजण जण दगावले होते. सातत्याने होणाऱ्या या घटनेची दखल घेऊन जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावाचे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या भूवैज्ञानिकांमार्फत सर्वेक्षण करण्ययात आले होते. यात प्रामुख्याने डोंगर उतारावरील गावांचा समावेश होता. नैसर्गिक धोके सौम्यीकरण पथदर्शी प्रकल्पा आंतर्गत ही पहाणी करण्यात आली होती.
या अंतर्गत सरवातीला जिल्ह्यातील ८४ गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता ही संभाव्य दरडग्रस्त गावांची संख्या १०३ वर पोहोचली आहे. रायगडमधील ९ गावे (वर्ग १) अतिधोकादायक, ११ गावे (वर्ग २) धोकादायक व ८३ गावे वर्ग ३) सौम्य धोकादायक आहेत.
तालुकानिहाय दरडीचा धोका संभवणारी गावे
- महाड- ४९
- पोलादपुर- १५
- रोहा- १३
- म्हसळा- ६
- माणगाव- ५
- पनवेल- ३
- खालापूर- ३
- कर्जत- ३
- सुधागड- ३
- श्रीवर्धन- २
- तळा- १
अतिधोकादायक श्रेणी आणि धोकादायक श्रेणीतील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या गावांमध्ये करावयाच्या उपययोजनांबाबत तातडीने पाऊले उचलण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांमधील धोका कमी करण्यासाठी भूवैज्ञानिकांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात प्रामुख्याने या परीसरातील खाणकाम आणि उत्खननावर निर्बंध घालण्यात यावे, डोंगर उतारावर वृक्ष तोडण्यास मज्जाव करण्यात यावा, पावसाळ्यापुर्वी डोंगर उतारवर सैल झालेले दगड हटवण्यात यावेत. डोंगर उतारावरील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, आणि दरड रोधक भिंतीची उभारणी करण्यात यावी, असा सूचना करण्यात आल्या आहेत.
SL/ML/SL
16 May 2024