आमदार अपात्रता प्रकरणे हाताळण्याचा अधिकार अध्यक्षांचा …
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही बाजूने आमदारांना अपात्र ठरवण्याची विधानसभेत दाखल केलेली प्रकरणे याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनाच कायदा, नियम व कायदेशीर प्रक्रियेनुसार घ्यावा लागेल व त्यासाठी वेळ मर्यादा सांगता येणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केले आहे.
आमदारांना अपात्र ठरवायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे स्वतंत्र नियम आहेत, आमदार अपात्रता हा विषय घटनेच्या दहाव्या अनुच्छेदातही हाताळला गेला आहे आणि त्या शिवाय अध्यक्षांपुढे या विषयात जी सुनावणी होते त्यासाठी दिवाणी कायदा संहिताही लागू होते, त्यामुळे दोन दिवसात नोटीस दिली आणि लगेच आमदारांना अपात्र ठरवले असे होऊ शकत नाही असेही नार्वेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.Rahul Narvekar
या संदर्भात उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जून २०२२ मध्ये जे निर्णय दिले किंवा ज्या नोटिसा काढल्या त्याला सर्वोच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली आहे.
नार्वेकर हे अध्यक्ष आणि व्यावसायिक वकीलही आहेत. आज विधानभवात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयात जे विषय आहेत त्यात घटनेच्या दहाव्या अनुच्छेदांतर्गत सर्वोच्च न्यायालय विचार करेल. त्यांनी विधानसभा अध्यक्षपुढे सुरु असणाऱ्या या संबंधीच्या प्रकरणात कोणताही स्थगनादेश दिलेला नाही.
त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या न्यायासना समोर जी आमदार अपात्रतेची प्रकरणे दाखल झाली आहेत त्याचा निर्णय केवळ अध्यक्षांनीच घ्यायचा असून तो विधानसभेचे नियम, घटना तसेच दिवाणी कायदा संहिता यानुसार घ्यायचा आहे. त्याच्या नोटिसा जारी झालेल्या आहेत, असेही नार्वेकर म्हणाले.
या प्रक्रियेला कायद्यानुसार जितका वेळ लागेल तितका लागेल, निकाल कधी लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही असेही नार्वेकर म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसच्या काही आमदारांनी नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे, त्या संदर्भात नियमानुसार योग्य ती कारवाई होईल असे सांगून नार्वेकर म्हणाले की विधानसभेत एखाद्या विषयाची चर्चा आणि त्यावर ठराव झाल्यानंतर वर्षभरानंतर त्या विषयाचा पुन्हा ठराव घेता येतो. अध्यक्षांवरील विश्वास ठराव गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता अशीही आठवण नार्वेकरांनी यावेळी करून दिली.
ML/KA/PGB
18 Jan. 2023