राहुल गांधींच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उद्या प्रचाराचे रणशिंग
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस आणि महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत.
BKC मधील सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेत काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्ष या गॅरंटी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवणार असून महायुतीच्या भ्रष्ट कराभाराबाबत जनजागृती करणार आहेत असे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे-भाजपा-अजित पवार युती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे तो मविआ परत आणेल. तसेच भाजपाच्या फेक नेरेटिव्हलाही चोख उत्तर दिले जाईल. काँग्रेसने कर्नाटक विधानसभेपासून गॅरंटी जाहीर केल्या असून ज्या जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरु आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने कोणत्या गॅरंटी जाहीर केल्या आणि त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे हे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला राज्यातील जनता बळी पडणार नाही, असेही लोंढे म्हणाले.
ML/ML/PGB
5 Nov 2024