कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला व्यासपीठ

 कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला व्यासपीठ

मुंबई, दि. ३ :– समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी रेडिओ यांनी करावे, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले.

मुंबईत सुरू असलेल्या ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मुरुगन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, सहसचिव पृथुल कुमार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या कुलगुरु डॉ. अनुपमा भटनागर आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कम्युनिटी रेडिओ यांना इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशन, प्रमोटिंग लोकल कल्चर, सस्टेनेबिलिटी मॉडेल अवॉर्ड्स यासारखे विविध पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

राज्यमंत्री मुरुगन म्हणाले, कम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक समाजाच्या भावना, तेथील संस्कृती, कला, साहित्य, खानपान यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. वेव्हजच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याने त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून माहिती व मनोरंजनाबरोबरच महिला सक्षमीकरण, संस्कृतीवर्धन, ग्रामीण विकासासाठी काम होत आहे याचे समाधान वाटते. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यानंतर कम्युनिटी रेडिओशी संबंधित विविध विषयांवर दिवसभर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रांमध्ये कम्युनिटी रेडिओच्या आर्थिकदृष्ट्या विकासाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये देशातील विविध विद्यापीठातील विषयतज्ज्ञांनी तसेच विविध कम्युनिटी रेडिओच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *