मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण सुरू

 मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण सुरू

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ’रेबिजमुक्त मुंबई’ साठी पालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला असून पालिका आणि योडा व कॅप्‍टन इंडिया झिमॅक्‍स या स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर २६ भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात आले. लसीकरणानंतर या भटक्‍या श्‍वानांच्‍या गळ्यात ‘क्‍यूआर कोड’ असलेले ‘कॉलर’ घालण्‍यात आले . परिणामी, क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर श्‍वानाच्‍या माहितीसह त्‍याला खाद्य देणा-याचा (फिडर) तपशील, लसीकरण, निर्बिजीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्‍यास मदत मिळणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱया रेबिज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर पालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्‍यात आले असून त्‍यासाठी विविध स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्‍हणून २५ जुलै रोजी मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्‍थांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. केवळ निर्बिजीकरण, लसीकरण यांवर न थांबता श्‍वानांच्‍या आरोग्‍यासाठी पालिका आता अत्‍याधुनिक उपाययोजना राबविणार आहे.

२०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्‍वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्‍वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. पालिकेच्या वतीने भटक्या श्‍वानांच्‍या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. दर दहा वर्षांनी श्वान जनगणना होते. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे . त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहिम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.

SW/KA/SL

24 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *