महाराष्ट्र साजरे करणार क्वांटम विज्ञान – तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष !
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र सरकारच्या माहिती – तंत्रज्ञान विभाग UNESCO सोबत भागीदारी करणार असून 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान – तंत्रज्ञानशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती – तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
नॉबेल पारितोषिक विजेत्या जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रांनी २०२५ हे वर्ष क्वांटम विज्ञान – तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. क्वांटम विज्ञानाच्या परिवर्तनकारी क्षमतेला ओळखून, महाराष्ट्र सरकारने या क्षेत्रात संशोधनाचा, नवकल्पनांचा आणि क्षमता निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे.
मंत्री अॅड. शेलार यांनी सांगितले की, ही भागीदारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत २०४७” या दृष्टीकोणाशी जोडलेली आहे. भारत सरकारने २०२३ मध्ये विज्ञान – तंत्रज्ञान मंत्रालयालांतर्गत राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, ते भारताच्या क्वांटम क्षेत्रातील नव्या संधींसाठी मार्ग तयार करत आहे.
“महाराष्ट्र या क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय संस्थांसोबत सक्रियपणे जोडले जाण्याचा प्रयत्न करीत असून एक एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत आहे,” असेही शेलार यांनी सांगितले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य माहिती – तंत्रज्ञान विभाग विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांसाठी परिषद, कार्यशाळा आणि तज्ञांची व्याख्याने आयोजित करणार आहे. कौशल्यविकास, तंत्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय क्वांटम मिशन आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाईल अशी माहिती देखील मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विश्वविद्यालयासोबत भागीदारी करून क्वांटम संबंधित कौशल्यविकास कार्यक्रम राबवण्याचा आणि केंद्र सरकाराच्या सहकार्याने ‘क्वांटम सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब’ स्थापन करण्याचा विचार करत असल्याबाबत देखील मंत्री अॅड. शेलार यांनी माहिती दिली.
उच्चस्तरीय तज्ञांच्या टास्कफोर्स अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्रात पहिल्या कृत्रिम बुध्दीमता विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात क्वांटम तंत्रज्ञानाचा आधिच समावेश करण्यात आला आहे. तसेत महाराष्ट्र एआय धोरण टास्कफोर्स आणि सायबर सुरक्षा धोरण टास्कफोर्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या परिणामांचा अभ्यास करत असून, ते त्यांच्या धोरणात्मक शिफारशींमध्ये संबंधित विषय समाविष्ट करतील असेही मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.
ML/ML/PGB 5 Feb 2025