कौमी तंजीमच्या राष्ट्रीय समितीची बैठक दिल्लीत संपन्न; मुनाफ हकीम यांनी अभिषेक मनु सिंघवी यांचा सत्कार केला

मुंबई, दि 30 :
ऑल इंडिया कौमी तंजीम या देशव्यापी संघटनेच्या राष्ट्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीतील संविधान क्लब येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार तारीक अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशभरातील प्रमुख पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा खासदार डॉ. अभिषेक मनु सिंघवी आणि माजी खासदार व पत्रकार शाहिद सिद्दीकी यांचा महाराष्ट्र प्रदेश कौमी तंजीमच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी सिंघवी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
बैठकीत खासदार कुंवर दानिश अली, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष, माजी मुख्य न्यायाधीश इक्बाल अन्सारी, दिल्ली विद्यापीठाचे प्रा. रतन लाल, सुप्रीम कोर्टाचे वकील बलराज मलिक आदींची उपस्थिती होती. विविध वक्त्यांनी देशातील सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना अल्पसंख्यांक, विशेषतः मुस्लिम समाजावरील अन्याय, न्यायव्यवस्थेतील भेदभाव, संविधान बदलण्याचे प्रयत्न आणि द्वेषाचे वातावरण याविरोधात आवाज उठवण्याची गरज अधोरेखित केली.
खासदार तारीक अन्वर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “एक समाज म्हणून आपण संघटित धर्मांध शक्तींविरोधात उभे राहिले पाहिजे. देशात जर एखाद्या विशिष्ट समाजाला दुय्यम वागणूक दिली जात असेल, तर अशा परिस्थितीत देश कधीही प्रगती करू शकणार नाही.”
यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी वक्फ कायद्यातील त्रुटींवर प्रकाश टाकत संविधानिक हक्कांबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “वक्फ मालमत्तेबाबत सुरू असलेले कायदे केवळ अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांचे उल्लंघन करत नाहीत, तर ते लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहेत.”
महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या इतर प्रतिनिधींमध्ये माजी मंत्री अनीस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अली अशरफ, हाजी एम. डी. शेख, सरचिटणीस आफताब शेख, अॅड. आसिफ हकीम, हाजी जाकीर शेख, अबू हसन खोत, आरिफ कांचवाला आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी कौमी तंजीमचे सरचिटणीस व दिल्ली काँग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख हिदायतुल्ला यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की, “ही बैठक फक्त चर्चा करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर देशातील अराजकता, धार्मिक ध्रुवीकरण आणि सामाजिक विषमता याविरोधात एकत्र येऊन उपाय शोधण्याचा प्रयत्न होता.”
ही बैठक म्हणजे देशात लोकशाही, संविधान व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी असलेले प्रयत्नाचे प्रतिबिंब ठरले.