मराठीत पाट्या दोन महिन्यात लावा, सर्वोच्च न्यायालय

 मराठीत पाट्या दोन महिन्यात लावा, सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात जास्तीत जास्त मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्या. बी. वी. नागरत्ना आणि न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. “तुम्ही मराठी भाषेत पाट्या का लावू शकत नाही? कर्नाटकातसुद्धा असाच नियम आहे. असं नाही केलं तर दुकानदार मराठी फॉन्ट छोटा ठेवतात. आता दसरा, दिवाळी येतेय, त्यामुळे व्यापार वाढवण्याची चांगली संधी आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठी भाषेत पाट्या असण्याचे फायदे माहिती नाहीत का?” असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला. मराठी पाट्यांसाठीचं आंदोलन उभं करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, “पुढील 2 महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.’मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत.” असं त्यांनी म्हटलं आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ते म्हणतात, “मराठी पाट्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत. मराठी पाट्या संदर्भात शासन सातत्याने प्रयत्नशील असते.मात्र काही व्यापारी याला विरोध करत न्यायालयात जातात.आता न्यायालयानेच यांना चपराक दिलेली आहे. हे मराठी भाषिक राज्य आहे इथे दुकानांवर मराठी भाषेत पाट्या पाहिजेत.”

ML/KA/SL
27 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *