महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उभारलेल्या सर्व सुविधांयुक्त पुस्तकांच्या दालनांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि ७
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येतात. या अनुयायांना बृहन्मुंबई महानगरपालिका विविध नागरी सुविधा दरवर्षी पुरवित असते. यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर पुस्तक व वस्तू विक्रेत्यांना दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) स्वतंत्र दालन (गाळे) उपलब्ध करून दिले. पुस्तक विक्रेत्यांना दिनांक ४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी एकूण ३८० दालन देण्यात आले. महानगरपालिकेने पुरविलेल्या सुविधांमुळे विक्रेत्यांची आणि ग्राहकांची मोठी सोय झाली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या.
दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमी (दादर) येथे येतात. दिनांक ४ ते ६ डिसेंबर या तीन दिवसात हे अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, ग्रंथ, छायाचित्र विकत घेतात. दरवर्षी ठेकेदारांकडून पुस्तक विक्रेत्यांना उघड्यावर केवळ बांबू आणि कापड याच्या आधारे पुस्तक विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतः प्रायोगिक तत्त्वावर थेट विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिनांक ४ डिसेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत क्रमांकित दालनं दिली. अशी एकूण ३८० दालने देण्यात आली. ८ फूट बाय ८ फूट आकाराच्या प्रत्येक दालनांमध्ये विक्रेत्याला वीज, दोन खुर्च्या, दोन टेबल, पंखा, मोबाईल चार्जिंगची सुविधा पुरविण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि बिहार मधूनही विक्रेते या ठिकाणी आले होते.
या ठिकाणी बाबासाहेबांवर आधारित पुस्तक, ग्रंथ, आवश्यक साहित्य उपलब्ध होते. तसेच काही दालनं ही प्रबोधन आणि मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांना देखील देण्यात आली होती. ३८० दालने एकाच छताखाली होती. हे छत वॉटरप्रूफ होते. खरेदीदार आणि विक्रेत्यांना एकाच छताखाली सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या. या उपक्रमाचा विक्रेते आणि खरेदीदार या दोघांनाही मोठा लाभ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या व्यवस्थेमुळे परिसरात शिस्तबद्धता निर्माण झाली. तसेच सार्वजनिक मार्गक्रमण सुलभ झाले. अनेक पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले की, “यंदा विक्री पूर्वीपेक्षा अधिक झाली असून, खरेदी करताना ग्राहकांना थांबण्यासाठी आणि पुस्तके निवडण्यासाठी पुरेशी जागा मिळाली. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.”
वाचकांकडूनही ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विशेषतः विद्यार्थी, संशोधक आणि तरुण वाचकांनी विविध विषयांवरील पुस्तके सहजपणे पाहता आणि खरेदी करता आली, असे सांगितले. या उपक्रमाचे स्वागत करताना अनेकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले.KK/ML/MS