पत्रलेखक चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्रपंढरी पुस्तकाचे झाले प्रकाशन
मुंबई, दि ३: गेल्या अर्धशतकापासून
समाजातील विविध समस्यांवर आवाज उठवून न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रलेखक आणि शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्रपंढरी ३ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते दादर येथे करण्यात आले. पाटणकरांचे हे पुस्तक म्हणजे समाज भान जपणाऱ्या ‘जागल्या’चे आत्मकथन असून हे पुस्तक नव्या पिढीच्या पत्रलेखकांना सतत प्रेरणा देत राहील, अशी भावना शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटणकर यांनी गेली ५० वर्षे विविध वृत्तपत्रांमध्ये सातत्याने पत्रलेखन करून अनेक समस्यांना वाचा फोडली. पत्रांमधून राजकारणी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला. त्यांच्या माझी पत्रपंढरी १ या पुस्तकाचे प्रकाशन दिवंगत शिवसेना नेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष दत्ताजी साळवी यांच्या हस्ते झाले होते. तर माझी पत्रपंढरी -२ या पुस्तकाचे प्रकाशन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ शंकरशेट, आमदार महेश सावंत, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, मिलिंद वैद्य, शिवसेना माहीम विधानसभा संघटक राजू पाटणकर, पत्रकार चंद्रशेखर दाभोळकर, वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष विजय कदम शिवसैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.KK/ML/MS