मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे २०२५ चे पुरस्कार जाहीर
मुंबई दि ६ ः मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२५ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. ‘कृ. पां. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी (वृत्तपत्र ) ‘लोकसत्ता’ चे प्रतिनिधी अशोक अडसूळ यांची तर वृत्तवाहिनीसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी ‘इंडिया टुडे-आज तक’ ग्रुपचे पुणे ब्युरो चीफ ओंकार वाबळे यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असलेल्या उत्कृष्ट पुरस्कार ‘अॅग्रोवन’चे बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे.
६ जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि सरचिटणीस दीपक भातुसे यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, प्रकाश सावंत, सदस्य सचिव सुजित महामुलकर यांच्या निवड समितीने या पत्रकारांच्या नावांची पुरस्कारासाठी केलेली शिफारस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मान्य केली.
यापूर्वी कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार वसंत देशपांडे, विनायक बेटावदकर, विजय वैद्य, दिनू रणदिवे, दिनकर रायकर, प्रकाश जोशी, अजय वैद्य, प्रतिमा जोशी, पंढरीनाथ सावंत यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. यंदाच्या निवड झालेल्या पुरस्कारांचे लवकरच समारंभपूर्वक वितरण करण्यात येईल.ML/ML/MS