ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार

पुणे, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२५ चा पुण्यभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी आज प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविली आहे. यंदा या पुरस्काराचे ३७ वे वर्ष आहे. सलग ३६ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. अवघे मोगल साम्राज्य हादरवून टाकणाऱ्या बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि या नगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा यांचा समावेश असलेले वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर दोन लाख रूपये रोख रकमेची थैली सन्मानित पुणेकरास दिली जाते.याआधी महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी, शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदुचे संपादन एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशिलकुमार शिंदे, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, विकास आमटे, आशा भोसले, शरद यादव, नितीन गडकरी, पं.हरिप्रसाद चौरासिया, पं. अमजद अली खान, पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, पद्मविभूषण नारायण मूर्ती आदी मान्यवरांनी नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे. यंदा देखील लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार वीर जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.