‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा टिझर लॉन्च

 ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’  चित्रपटाचा टिझर लॉन्च

मुंबई, दि.१ : ‘स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’ या घोषणेसह ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या मराठी चित्रपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने आणि नित्यश्री यांसारखे तगडे कलाकार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.या चित्रपटात केवळ ऐतिहासिक गौरव नव्हे, तर आजच्या महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर शिवाजी महाराजांच्या विचारांद्वारे भाष्य करण्यात आले आहे. मराठी अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मुंबईतील मराठी माणसांचे स्थान, परप्रांतीयांची मुजोरी यांसारख्या विषयांवर चित्रपटात ठळकपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटाची कथा-पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांची असून चित्रपटाची प्रस्तुती झी स्टुडिओजने केली आहे.टीझर लॉन्च प्रसंगी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा माझा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी स्वराज्य उभं राहिलं, पण त्यातून जनमानसही जागृत झालं. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच, पण वर्तमानाला प्रश्न विचारणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल”.

SL/ ML / SL1 Oct 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *