तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या आंदेकर टोळीचा उमेदवार विजयी
पुणे, दि. १६ : निवडणूकांमध्ये गुन्हेगारांना उमेदवारी देणे हा राजकीय ट्रेंड घातक असला तरीही ते आजचे एक भीषण राजकीय वास्तव आहे. तुरुंगातूनही उमेदवार जिंकून येऊ शकतो या संदेशातून राजकीय पक्षांना समाजात नेमका काय संदेश द्यायचा आहे, हा मुद्दाच यामुळे फोल ठरतो. पुणे मनपा निवडणुकीत कुख्यात आंदेकर टोळीचा उमेदवार तुरुंगात असूनही निवडून आला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना पक्षाकडून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. या निर्णयावर राजकीय व सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक २३ मधून या दोघींना अधिकृत उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक २३ मधील लढत विशेष लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा निकाल आज स्पष्ट झाला असून, दोघींनीही विजय संपादन केला आहे.
तुरुंगात असतानाही मिळालेला हा विजय राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा मानला जात आहे. या निकालामुळे निवडणुकीतील नैतिकता, उमेदवारांची पार्श्वभूमी आणि मतदारांचा कौल यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
याच प्रभागातून शिवसेनेचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनीही निवडणूक लढवली होती. मात्र, अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. धंगेकर कुटुंबाचा या परिसरातील प्रभाव लक्षात घेता, हा निकाल शिवसेनेसाठी धक्कादायक मानला जात आहे. मतदारांनी दिलेला कौल अनेक राजकीय समीकरणे बदलणारा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
SL/ML/SL