पुण्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी ५० हजार कोटींचे उड्डाणपूल

 पुण्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी ५० हजार कोटींचे उड्डाणपूल

पुणे, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी ५० हजार कोटींचे उड्डाणपूल उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू तसेच पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड आणि मंचर रस्ते चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च , तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, पुणे येत्या काळात विकासाचे केंद्र आहे. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबत शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा. पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अपेक्षित सर्व निधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गडकरी म्हणाले, पुण्यात हवेतून चालणाऱ्या एअर बसेसबाबतही अभ्यास करावा. तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होत असल्याने अशा प्रकल्पांच्या बाबतीतही तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. चांदणी चौक प्रकल्पासाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पुण्यातील प्रदूषण कमी करण्यावरही भर देणे आवश्यक आहे. पुण्यातील ऑटो रिक्षांना नवे परवाने देताना इलेक्टिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल.

ग्रीन हायड्रोजन हे भविष्य असल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा. पुण्यातील सर्व कचऱ्याचे विलगिकरण करून पुणे चक्राकार मार्गासाठी वापरल्यास कचऱ्याची समस्या दूर होईल. पुण्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करून उद्योग, शेती आणि रेल्वेला दिल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल.

राज्य शासनाने नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून सोलापूर, पुणे आणि नाशिक सारख्या शहरातील रस्ते प्रकल्पाच्या कामांसाठी भूसंपादन वेगाने झाले. चांदणी चौकातील प्रकल्पासाठीही याचा उपयोग झाला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम केल्याचे कौतुगोदगर त्यांनी काढले. पुण्याला पाऊण दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महामेट्रोतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘एक पुणे कार्ड’चे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

असा आहे एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प

पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर सर्व मार्गिकांसहित एकूण १६.९८ किलोमीटर लांबीचा पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची किंमत ८६५ कोटी असून प्रकल्पामुळे परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत आणि बाह्य सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ८ वेगवेगळ्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली आहे.

मुळशी-सातारा, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण, सातारा/कोथरूड-मुळशी, पाषाण-मुंबई, पाषाण-सातारा, सातारा/कोथारूड-पाषाण आणि मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे अशा आठ मार्गिका आहेत.

एनडीए ते पाषाण ओव्हरपास आणि पाषाण ते मुंबई तसेच सातारा/कोथरूड ते मुळशी असे दोन अंडरपासही करण्यात आले आहेत.

एनडीए चौकात येणारी सर्व बाजूंची वाहतूक सिग्नलमुक्त करण्यात आली आहे. जून्या पुलाच्या ठिकाणी नवा विस्तारीत पूल उभारण्यात आला आहे. परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येत आहे.

खेड आणि मंचर येथील येथील वळण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची लांबी १४.१३७ किलोमीटर असून प्रल्पाची किंमत ४९५ कोटी आहे.

ML/KA/PGB 12 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *