पुणे पोलिसांकडून अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस

 पुणे पोलिसांकडून अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस

पुणे, दि. 18 : पुणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं आहे. पुण्यासह, मुंबई, गोवा, गुवाहाटी येथून 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 3.45 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे पोलीस परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाईमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या विविध बँकेतील खाती, क्रिप्टो व्होलेट व परदेशी चलनातून सुमारे 7 लाख 80 हजार रक्कम गोठवण्यात आली आहे. पुण्यातील खडकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली होती. तुषार चेतन वर्मा (वय 21) असं या तरुणाचे नाव होतं. त्याच्याकडे चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली.

यातील सर्व जण डार्क वेबचा वापर करत होते. डार्क वेबच्या सहाय्याने अंमली पदार्थांची खरेदी व विक्री करण्यासाठी यातील प्रमुख आरोपी वर्माने त्याचं नाव “अलख निरंजन” असं ठेवलं होतं. खरेदी विक्रीसाठी लागणाऱ्या पैशांच्या व्यवहारावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सगळी देवाणघेवाण करत होते. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोर फक्त भारतातील शहरापर्यंत मर्यादित नसून थेट थायलंड, भूतान सारख्या देशांपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणी अजून 5 जणांचा शोध पोलिसांकडून सुरू असून त्यातील काही जण परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे.

यातील अनेक आरोपी हे अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी चक्क ऑनलाईन डिलिव्हरी अॅप्लिकेशनचा वापर करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे. ज्या पद्धतीने या ड्रग्सची मागणी येत असे त्याप्रमाणे काही ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून याची खरेदी व विक्री केली जात होती. अशा ऑनलाइन डिलिव्हरी अँप कंपनीच्या मालकांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *