बेशिस्त वाहनचालकांवर पुणे पोलिसांची AI द्वारे नजर

पुणे, दि. १८ : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावर ‘AI’वर आधारित वाहतुकीचे नियमभंग शोधणारी प्रणाली दोन ठिकाणी बसवण्यात आली असून, तिच्या आधारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दणका देण्यात येणार आहे. डबल पार्किंग करणारे, पदपथावर वाहने उभी करून गप्पा मारणारे, ‘ट्रिपल सीट’, नो-एंट्रीतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
AI आधारित प्रणालीमुळे अशा चालकांवरही पुराव्यासह कारवाई करता येणे शक्य होणार असल्याने सामान्यांना दिलासा मिळेल आणि वाहतुकीस शिस्त लागण्यास मदत होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
महापालिका आणि पोलिसांनी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अल्पमुदतीच्या आणि कमी खर्चाच्या उपाययोजनांवर काम करण्यास सुरुवात केली आहे. हैदराबाद येथील एका खासगी कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर ही AI प्रणाली फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर बसवली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरभर त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, या माध्यमातून दररोज लाखो बेशिस्त चालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.
वाहतूक पोलिसांनी या प्रणालीसंदर्भात महापालिकेला पत्र लिहिले आहे. त्यात शहरातील वाहतूकस्थितीचे चित्र नमूद केले आहे. मोठ्या रस्त्यावर एखादे वाहन चुकीच्या पद्धतीने उभे केल्यास वाहतुकीची एक बाजू बाधित होत असून, तासाला किमान ५०० वाहनांना त्याचा फटका बसतो. अनेकदा मालाची वाहतूक करणारी वाहने गर्दीच्या वेळी रस्त्यावर उभी केली जातात. या वाहनांवर पोलिसांना कारवाई करण्यास मर्यादाही येते. पोलिसांनी विकसित केलेल्या या नव्या प्रणालीत एखादे वाहन रस्त्यावर किती वेळ उभे आहे, याची माहिती टिपून तातडीने त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करणार आहे.