पुण्यातील उद्योगपतीची बिहारमध्ये सायबर हत्या

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायबर गुन्हेगारांनी देशाच्या विविध भागांत लोकांना लुबाडल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. बिहारमधील सायबर गुन्हेगारांनी पुणे येथील एका उद्योजकांची हत्या केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका उद्योगपतीची सायबर हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कोथरुड येथे वास्तव्यास असलेले उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
लक्ष्मण शिंदे यांची बिहारच्या पाटण्यात हत्या करण्यात आली. कंपनीच्या कामासाठी मेल करत उद्योगपतीला पाटण्यात बोलवण्यात आलं. स्वस्तात मशीन मिळेल, असं सांगत लक्ष्मण शिंदे यांना आरोपींनी पाटण्यात बोलावलं होतं. आरोपींनी बनावट मेल आयडीद्वारे शिंदे यांच्याशी संपर्क केला होता अशी माहिती आता उघड झाली आहे.
लक्ष्मण शिंदे यांची पुण्याजवळील खेड शिवापूर येथे गाड्यांमध्ये असणाऱ्या बेरिंगच्या निर्मितीची मोठी कंपनी आहे. याच बेरिंग बनवण्यासाठी एक मोठी मशीन आमच्या इथे मिळेल, असं आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना बनावट मेलद्वारे सांगितलं होतं. तसेच फोन करुनही शिंदे यांच्यासोबत बातचित केली होती. याच अनुषंगाने आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना पाटण्यात बोलवून घेतलं.लक्ष्मण शिंदे हे पाटण्यात गेल्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना एका शेतात नेण्यात आलं. तिथे आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण ते पैसे न मिळाल्याने आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांची हत्या केली.
SL/ML/SL15 April 2025