पुण्यात मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा, भक्तांचा उत्साह ओसंडून वाहिला
पुणे दि २७ — पुण्यात आज गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मूर्ती अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीत दाखल झाली व सवितानंद महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. दुसरे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतींची प्रतिष्ठापना प.पू. शरदशास्त्री जोशी यांनी केली असून, मंडळाने यंदा कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
तिसरे श्री गुरुजी तालीम गणपतींची प्रतिष्ठापना उद्योजक पुनीत बालन यांनी केली. मंडळाने वाराणसीच्या श्री काशी विश्वनाथ मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे. चौथ्या श्री तुळशीबाग गणपतींची प्रतिष्ठापना योगी निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते झाली, तर पाचवे केसरीवाडा गणपती साधेपणाने रोहित टिळक यांच्या हस्ते प्रतिष्ठापित झाले.
प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींची प्रतिष्ठापना स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते झाली असून, यंदा केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अखिल मंडई मंडळाचा गणपती यंदा १३२वे वर्ष साजरे करत असून, शारदा गजाननाची प्रतिष्ठापना नवीनचंद्र मेनकर यांच्या हस्ते झाली. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतींची प्रतिष्ठापना जया किशोरी यांनी केली.
ढोल-ताशांच्या गजरात, बँड, नगारावादन, आकर्षक रथसजावटीत बाप्पाचे आगमन झाले असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी करून गणरायाचे स्वागत केले.ML/ML/MS