अंतराळात हरपले १६ उपग्रह, ISRO ची नवर्षातील पहिली मोहिम अयशस्वी
श्रीहरीकोटा, दि. १२ : ISRO च्या नववर्षातील पहिल्याच अंतराळ मोहिमेत मोठा धक्का बसला आहे. आज ISRO च्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV-C62) मोहिमेदरम्यान प्रक्षेपणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात (PS3 stage) अखेरच्या क्षणी मार्गात विचलन (deviation) आढळून आले. ज्यामुळे अपेक्षित कक्षेत (ऑर्बिट) जाणे शक्य झाले नाही. परिणामी या मोहिमेत पाठवण्यात आलेले सर्व १६ उपग्रह अंतराळात विखुरले.
“PSLV-C62 मोहिमेदरम्यान PS3 टप्प्याच्या शेवटी तांत्रिक अडथळा निर्माण झाला. या संदर्भात सविस्तर विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.” असे, ISRO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना सांगितले आहे. ही मोहीम इस्रोची २०२६ मधील पहिली अंतराळ मोहीम होती. या अंतर्गत EOS-N1 (अन्वेषा) हा प्रमुख उपग्रह, १४ सहप्रवासी उपग्रह आणि एक री-एंट्री कॅप्सूल अवकाशात पाठवण्यात आले होते.
आज १२ जानेवारी २०२६ रोजी श्रीहरिकोटा येथून PSLV-C62 चे सकाळी १०.१७ वाजता प्रक्षेपण यशस्वी झाले होते. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार प्रक्षेपणानंतर सुरुवातीचे काही मिनिटे सर्व काही नियोजनानुसार पार पडले. चार टप्प्यांच्या PSLV रॉकेटपैकी पहिला आणि दुसरा टप्पा पूर्णपणे यशस्वी ठरला. मात्र तिसऱ्या टप्प्यात रॉकेटच्या उड्डाण मार्गात विचलन दिसून आले, ज्यामुळे अपेक्षित कक्षेत (ऑर्बिट) जाणे शक्य झाले नाही.
इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, “PSLV हे चार टप्प्यांचे प्रक्षेपण वाहन आहे, ज्यामध्ये दोन घनइंधन (सॉलिड) आणि दोन द्रवइंधन (लिक्विड) टप्पे आहेत. तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीपर्यंत वाहनाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होती. मात्र, त्याच टप्प्याच्या शेवटी वाहनात अधिक अस्थिरता दिसून आली आणि उड्डाण मार्गात विचलन आढळले. सध्या सर्व डेटा तपासला जात असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल.” सध्या उपलब्ध डेटाचे सखोल विश्लेषण केले जात असून, लवकरच अधिक तपशील जाहीर करण्यात येतील. मात्र, त्यांनी अद्याप मोहिमेला पूर्ण अपयश किंवा यश असे स्पष्टपणे घोषित केलेले नाही.
SL/ML/SL