अमेरिकेतील ५० राज्यांत ट्रम्पविरोधात आंदोलन

 अमेरिकेतील ५० राज्यांत ट्रम्पविरोधात आंदोलन

वॉशिग्टन डीसी. दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशहीतासाठी म्हणून घेतलेल्या कठोर निर्णयांना आता त्यांच्या देशातूनच विरोध होताना दिसत आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांविरोधात लावलेल्या टॅरिफविरोधात अमेरिकन जनता आता रस्त्यावर उतरली आहे. अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये जवळपास १२०० ठिकाणी ट्रम्प यांच्याविरोधात ‘हँड्स ऑफ’ आंदोलन करण्यात आले. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात होणारे हे पहिलेच मोठे आंदोलन आहे.

बोस्टन, शिकागो, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली. त्यात नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, एलजीबीटीक्यू प्लस समुदायाचे समर्थक, निवडणूक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. ट्रम्प यांच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरून तसेच धोरणांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आता महागाई गगनाला भिडणार असल्यामुळे अमेरिकन जनतेने मॉलमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला तसेच वस्तूंची साठवणूक करायला सुरुवात केली आहे.

अमेरिकेच्या मिडटाऊन मॅनहॅटन, न्यूयॉर्कपासून ते अँकरेज (अलास्का) पर्यंत हजारो लोकांनी ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात घोषणा दिल्या. लॉस एंजेलिसमध्ये पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत हजारोंच्या संख्येने निदर्शकांनी रॅली काढली. पोर्टलँड, ओरेगॉन येथे देखील मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांनी फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन निदर्शने केली. त्यावर ‘हँड्स ऑफ डेमोक्रसी’, ‘फाइट फॉर राइट्स’, स्टॉप द ऑलिगार्ची’ अशा घोषणा लिहिल्या होत्या. निदर्शकांनी फेडरल एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात हटवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली.

SL/ML/SL
7 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *