POP मूर्तीवरील कोर्टाच्या बंदी विरोधात एकवटले राज्यभरातील मूर्तिकार

मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
PoP च्या मूर्ती बनविण्यावर आणि विसर्जनावर उच्च न्यायालयाने पूर्णतः बंदी घातली आहे. परंतु या बंदीला राज्यभरातील मूर्तिकारांनी विरोध दर्शविला आहे. यामध्ये सरकारने योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करत पीओपी हे पर्यावरणपूरक असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनी काल मंगळवारी केला.परळ येथील नरे पार्क येथे पीओपी मूर्तिकारांचे एक महासंमेलन पार पडले.
यामधे अखिल महाराष्ट्र मूर्तिकार संघटना, गणेश प्रतिष्ठान यांसह अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या, तर राज्य सरकारच्या वतीने भाजपचे आमदार सत्यजीत देशमुख यांनी मूर्तिकारांना आश्वस्त केले. ते म्हणाले, ‘या प्रश्नावर योग्य तोडगा काढला जाईल.’ पीओपी गणेश मूर्तीवर न्यायालयाने बंदी घातली. त्यानंतर सरकार आणि महापालिकेने सुरू केलेल्या कठोर अंमलबजावणीला मूर्तिकार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. पीओपी गणेश मूर्ती अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात तयार केल्या जात आहेत.
या गणेशमूर्तीमुळे जर पर्यावरणाचे नुकसान होत असेल, तर त्यावर सरकारने तोडगा काढला पाहिजे. मात्र, अन्य बाबींमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीकडेही सरकारने लक्ष द्यावे, असा सूर या संमेलनात मूर्तिकारांनी लावला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेसुद्धा उपस्थित होत्या. पीओपी गणेश मूर्ती पर्यावरण पूरकच आहेत आणि सरकारने हा व्यवसाय वाचवण्यासाठी सन्मान्य तोडगा काढावा. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पीओपीच्याच गणेश मूर्ती तयार करतो. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी अखिल राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.