माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आंदोलन

ठाणे, २ : हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म, हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधान करत असतील त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. राज्यभरात युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी पुर्वेश सरनाईक यांनी केली.
तसेच देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री मा. श्री. अमित शहा यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळात अशी हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध व्यक्त करू. भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान आहे. त्याला कोणी ठेच पोहचवत असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही, अशा भावना पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या.
यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, जिल्हा समन्वयक अर्जुन धाबी, पालघर जिल्हा निरिक्षक नील पांडे, युवासेनेचे सिद्धेश अभंगे, पूजा लोंढे, श्रध्दा दुबे, अश्फाक चौधरी, विकेश भोईर, निखिल वाडेकर, ठाणे शहरातील युवासैनिक व युवतीसेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.