प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचा जागतिक दर्जा राखण्यासाठी केंद्राचे प्रोत्साहन
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवई येथील हॉटेल वेस्टिनमध्ये 3 ते 5 मे 2023 या कालावधीत फिक्की फ्रेम्सच्या 23 व्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले, ” प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल. भारतातील प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र खूप झपाट्याने प्रगती करत असतानाच जागतिक दर्जा गाठण्यासाठी त्यांना खूप पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी त्यांना आपला दर्जा वाढवावा लागेल. जगाला भारतीय कथा, किस्से आणि भारतीय संस्कृतीत रस आहे”.
मनोरंजन व्यवसायाशी निगडीत, आशियातील सर्वात मोठ्या आणि नियमित अधिकृत वार्षिक जागतिक संमेलनापैकी एक असलेल्या फिक्की फ्रेम्सचा हा 23 वा सोहळा आहे. या उद्योगासमोर असलेल्या मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या आव्हानांवर मात करण्याबाबत बोलताना चंद्रा म्हणाले की,’उद्योग जगताला मनुष्यबळाचा पुरवठा होण्यासाठी, सरकार अधिकाधिक संस्था स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहे’.
अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ग्राफिक्स या क्षेत्रांमध्ये भारतापाशी प्रचंड क्षमता आहे. ए व्ही जी सी कृती दलाची स्थापना आणि ए व्ही जी सी साठी राष्ट्रीय धोरण तयार केल्यामुळे, भारत ए व्ही जी सी उद्योगात जागतिक नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे, असं सचिव म्हणाले.
यावेळी फिक्कीचे अध्यक्ष आणि, इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुभ्रकांत पांडा, फिक्कीच्या मीडिया आणि मनोरंजन समितीच्या अध्यक्ष आणि वायकॉम 18 मीडिया च्या कार्यकारी प्रमुख, ज्योती देशपांडे, सुप्रसिद्ध अभिनेते आयुष्मान खुराना मीडिया आणि मनोरंजन, ईवाय चे भागीदार आशिष फेरवानी आणि फिक्कीचे सरचिटणीस शैलेश पाठक हे ही उपस्थित होते.
या तीन दिवसीय कार्यक्रमात चित्रपटउद्योग क्षेत्रात होत असलेल्या उत्क्रांतीचा उत्सव साजरा करत, या उद्योगाच्या भवितव्यावर पडणाऱ्या प्रतिबिंबाविषयी इथे विचारमंथन केले जात आहे. संमेलनाच्या कार्यक्रमात पॅनेल चर्चा, परिषदा, प्रदर्शने, गप्पा-संवाद, मास्टरक्लास आणि कार्यशाळा यांचा समावेश आहे. यात चित्रपट, टेलिव्हिजन, ॲनिमेशन, गेमिंग, संगीत आणि डिजिटल मीडिया आणि मीडिया आणि मनोरंजन उद्योगाशी संबंधित इतर उपक्षेत्रे अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.
SL/KA/SL
4 May 2023