मुंबई गोवा महामार्गासाठी, होम हवनाचा कार्यक्रम
महाड, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गाला लागलेली वाईट नजर उतरवण्यासाठी , हा महामार्ग लवकर होण्याचे गाऱ्हाणे घालण्यासाठी माणगाव एस. टी. बस स्थानकासमोर होम हवनचा कार्यक्रम करण्यात आला.
गेल्या १३ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे संथगतीने काम सुरू असून कोकणातील प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत असून एखादा अपघात घडला की एखाद्याला आजारी माणसाला उपचार करता मुंबईला घेऊन जाणताना महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्याला रस्त्यातच जीव सोडावा लागतो. आज पर्यंत तीन हजार पेक्षा जास्त कोकणकरांनी प्राण गमावले आहे, तर अनेक लोकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.
मुंबई गोवा महामार्ग निव्वळ मृत्यूचा सापळा बनला आहे. मुंबई गोवा महामार्गाला लागलेली वाईट नजर उतरवण्यासाठी तसेच गाऱ्हाणे घालण्यासाठी माणगाव एस टी स्टँड बस स्थानकासमोर जन आक्रोश समितीतर्फे होम हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी १५ ऑगस्ट पासून उपोषणाची घोषणा करण्यात आली.
३१ मे २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले होते, आत्ता जुलै २०२४ देखील कोकणकरांचा प्रवास सुखकर झालेला नाही. अद्याप रस्त्यावरचे खड्डे भरलेले नाहीत, जे काही डांबरीकरण झाले ते दोन महिने सुद्धा टिकले नाही.
अगदी निकृष्ट दर्जाचे काम महामार्गावर झाले असून महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे, मुंबई गोवा महामार्ग म्हणजे जणू मृत्यूचा सापळा बनला आहे, महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
ML/ML/SL
29 July 2024