राज्य शासनाच्या प्रचार प्रसार समन्वयकपदी प्रा.डॅा.ज्योती वाघमारे
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचविणे, त्यासाठी प्रभावी प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे) राज्य प्रवक्त्या प्रा.डॅा.ज्योती वाघमारे यांची मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार तथा प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.
प्रा.डॅा.ज्योती वाघमारे यांची दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हा पासून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या ध्येय-धोरणांची प्रभावीपणे मांडणी करुन राज्यभर पक्षाचे प्रचार कार्य केले आहे. विरोधकांना उत्तर देऊन त्यांनी राज्यातील महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राज्यभर प्रचाराचा केला. या काळात त्यांनी राज्यात ५३ सभा घेतल्या. त्यांची कामगिरी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची राज्य शासनाच्या प्रचार आणि प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत जनतेच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र, त्या कल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे कित्येक लोकांना त्या योजनांपासून वंचित रहावे लागते. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रचार तसेच प्रसार करण्यासाठी प्रा.डॅा.ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ML/ML/SL
7 July 2024