रत्नागिरीतील उत्पादने आता रेल्वेने थेट जेएनपीटी बंदरात…

 रत्नागिरीतील उत्पादने आता रेल्वेने थेट जेएनपीटी बंदरात…

रत्नागिरी, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात येथील उत्पादने पाठवता येणार आहेत. याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या वीस मिनी कंटेनर रेकने करण्यात आला. या करिता कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्पादने जगाच्या पाठीवर विविध देशात पाठवली जातात तशीच विविध उत्पादने येथे आयात ही होतात.यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेक मधून जिल्ह्यातील उत्पादने निर्यातीसाठी पाठवली जात होती. पण आता कोकण रेल्वेने या विषयात मोठे पाऊल उचलत रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक ची यंत्रणा उभी केली आहे. यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरी तून थेट जेएनपीटी बंदरात रवाना होणार आहे.

याचा शुभारंभ रत्नागिरीच्या गद्रे मरीन एक्सपोर्ट च्या निर्यात मालाने करण्यात आला. गद्रे मरीन एक्सपोर्ट चे पहिले वीस पूर्णतः वातानुकूलित मिनी कंटेनर रेक रत्नागिरीतून रवाना करण्यात आले. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, गद्रे मरीन एक्सपोर्टचे संचालक अर्जुन गद्रे, कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थितीत होते.

रत्नागिरी स्थानकातून हे पहिले मिनी कंटेनर रेक रवाना करण्यात आले. या करिता रत्नागिरी रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे कडून स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोकणातील आयात व निर्यातदारांना यामुळे गोव्यातून उपलब्ध होणाऱ्या रेक वर अवलंबून रहावे लागणार नाही. कोकणातील मत्स्य आणि फळ प्रक्रिया उद्योगांकरिता हि मोठी सुविधा कोकण रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे.

आयात आणि निर्यातदारांसाठी परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वे सतत प्रयत्न करीत आहे. कोकणातील आयात निर्यातदारांनी कोकण रेल्वेच्या या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले आहे.

ML/ML/SL

8 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *